माणसाचे मांगल्य चिंतणारी कविता—हॕपी होमच्या भिंतीआड
कवयित्री छाया बेले
साहित्याक्षर प्रकाशन
परीक्षण : मनीषा पाटील-हरोलीकर

माणसाने घ्यावी /माणसाची कड जळो मेली कीड/दंभाची ती//
मानव कल्याणाचे पसायदान मागणारी ही कविता सुप्रसिद्ध कवयित्री छाया बेले यांची आहे.नुकताच ‘हॕपी होमच्या भिंतीआड’ हा छाया बेले यांचा कवितासंग्रह आश्वासक कविता घेऊन मराठी साहित्यात दाखल झाला आहे.या संग्रहातील या काव्यपंक्ती आहेत.त्यांचा हा तिसरा कवितासंग्रह आहे.संग्रहामध्ये एकूण बासष्ठ कविता आहेत.हॕपी होमच्या भिंतीआड व भवताल जळत असताना अशा दोन विभागांमध्ये ही कविता आपणास भेटते.
अर्थातच पहिला भाग स्त्रीजाणिवांचे विविध कंगोरे अधोरेखित करणारा आहे.उंबरठ्यातील आतील व बाहेरील वास्तव कवयित्रीला विलक्षण अस्वस्थ करते.विविध नात्यांचे नाजूक पदर जपताना काळजाला हलकीशी जखम कधी होते हेही कळत नाही .पण त्या जखमेची सल दुखावत राहते आतल्या आत.कवयित्री म्हणते,
एक दिवस बाहेर जाताना दरारल्या डोळ्यांनी बघत म्हणतो, आई,पदर नीट घे ना तेव्हा मात्र तो पुरुष आसतो अन् ती बाई असते
घरोघरी मातीच्या चुली! हे खोटे नाही.बाईचा जन्म धाकात जातो.अगदी आई झाली तरी! हे वास्तव वाचताना जिवाची कालवाकालव होते.
पण ‘गाभुळल्या चिंचा समजून/चाखत राहते जीवन‘ असे म्हणत ती पुन्हा जगण्याला भिडते.दुःखाचे हलाहल पचवते.वेदनेचे कातळ फोडते आणि वेदनेच्या अतीव क्षणी कवयित्री लिहिते,
मी लिहिते नवा अध्याय बाई असण्याचा वेदनेतून सृजनाचा
कवयित्री चारचौघींसारखी फक्त आपल्याच परिघात रमत नाही. संग्रहातील ‘भवताल जळत असताना’ या विभागातील कविता यामध्ये येतात.वर्तमानाच्या दाहाने तिचे शब्द आणखी कणखर होतात.ती मिटल्या डोळ्याने संसारसुखाची स्वप्ने पहात नाही तर जळणा-या भवतालाने विचारात पडते.विविध स्तरावरील असमानता,मूल्यहीन समाजव्यवस्था,जातीभेद हे आजच्या समाजाचे बोचरे काटे जेव्हा कवयित्रीला डसतात तेव्हा ती म्हणते,
‘नव्याने रुजवावे लागतील मनामनात बुद्ध अन् कबीर’
जातियतेच्या विषवृक्षाखाली मानवतेचा वंश निर्वंश होईल की काय? हा प्रश्न आजच्या जागतिकीकरणाच्या काळात कवयित्रीला पडतो.जग मोबाईल क्लिकइतकं जवळ आलं पण माणूस माणसापासून दुरावत चाललाय.अधिकाधिक एकटा,एकाकी होत आहे.ही विनाशाची प्रचंड सुनामी आपल्या ओंजळीत काय ठेवून जाईल हे खरंच आज तरी सांगता येत नाही .माणसाच्या विपरीत वागण्याचे कोडे उलगडत नाही .अशा परिस्थितीत कवयित्री छाया बेले कवितेत विसावा शोधतात.कवयित्री कवितेलाच सांगतात,
कवितेने फिरुन घ्याव्यात अंधार उजेडाच्या खोल्या आणि कोळून प्यावेत जगण्याचे सारेच क्षण अन् चालत राहावं आभाळाच्या टोकापर्यंत
सुंदर प्रतिमाविश्व आणि तितकाच आशयगर्भ असा हा कवितासंग्रह आहे.सुपरिचित ‘साहित्याक्षर प्रकाशन’ने संग्रहाची उत्तम निर्मिती केली आहे.सरदार यांचे अर्थपूर्ण मुखपृष्ठ लाभले आहे.डाॕ.दिपाली या लाडक्या लेकीस छाया बेले यांनी हा कवितासंग्रह अर्पण केला आहे.प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक डाॕ.जगदीश कदम यांनी छाया बेले यांच्या कवितेची पाठराखण केली आहे.ते म्हणतात ,’ही कविता थेट बुद्धाशी आपलं नातं जोडून घेणारी आहे.’सुप्रसिद्ध कवी डाॕ.संजय बोरुडे यांनी ‘हॕपी होमच्या भिंतीआड’ या कवितासंग्रहाची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. प्रसिद्ध कवी डाॕ.विशाल इंगोले यांनी अभिप्राय लिहिला आहे.प्रकाशिका सौ.क्रांती राऊत व समन्वयक सुप्रसिद्ध साहित्यिका रचना यांनी कवितासंग्रहाची उत्तम निर्मिती केली आहे.कवयित्री छायाताई बेले या गंभीरपणे कविता लेखन करतात.प्रसार माध्यामांवर आजपर्यंत त्यांची कविता भेटत होतीच.ती एकत्रित संग्रहरुपाने वाचताना अधिक उलगडत गेली. या आश्वासक कवयित्रीच्या काव्यलेखनास मनःपूर्वक शुभेच्छा व खूप खूप अभिनंदन .
कवितासंग्रहःहॕपी होमच्या भिंतीआड
कवयित्रीःछाया बेले
प्रकाशनःसाहित्याक्षर प्रकाशन
पृष्ठसंख्याः१०४
मूल्यः१८०/
कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर
देशिंग-हरोली(सांगली)

उत्तम लेखन
उत्तम कवितेचे उत्तम परीक्षण – संजय बोरूडे सरांची प्रस्तावना संग्रहास असणे हे कवितेच्या श्रीमंतीचं लक्षण आहे. हे वाचल्यावर ही कविता वाचावीशी वाटते आहे.
रवीन्द्र दामोदर लाखे
०४.१०.२०२३