‘ कालिंदीच्या डोहातून’या किशोर मुघल लिखित काव्यसंग्रहाचा परिचय – वसंत शिंदे,सातारा


(या लेखात व्यक्त केलेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही – संपादक, साहित्याक्षर )
कालिंदीच्या डोहातून हा किशोर मुगल यांचा काव्यसंग्रह हाती येऊन आता बरेच दिवस लोटले आहेत. परंतु त्यावर विस्ताराने लिहायचं आज मनाने घेतलेलं दिसते आहे. किशोर मुगल हा माझा साहित्य क्षेत्रातला सर्वात जवळचा मित्र आहे. परंतू तो स्वतंत्र माणूस म्हणूनही मला कलंदर वाटतो. तो या अर्थाने की या माणसाला काय येत नाही असं जर तुम्ही शोधायचा प्रयत्न केला तर तुम्हाला आढळून येईल की, या माणसाला कवितेतले सगळे प्रांत लीलया हाताळता येतात. हा माणूस उत्तम गझल लिहीत होता, हा माणूस उत्तम मुक्तछंद लिहीत आहे, हा माणूस उत्तम अभंगरचना लिहितो आहे, हा माणूस उत्तमरित्य झोलाझोंडी सारखा काव्यप्रकार लिहितो आहे, हा माणूस उत्तमरित्या गुगलीमुगलीसारखा काहीसा वेगळा काव्यप्रकार काव्य रसिकांच्या समोर ठेवतो आहे. आणि म्हणूनच कवी म्हणून किशोर मुगल हा मला सर्वाधिक आवडतो. या माणसाकडून मी बरंच काही शिकलोय, शकतोय. या माणसाची मराठीच नाही तर हिंदीवरही तितकीच मजबूत पकड आहे. नामालूम हा तखल्लूस वापरून हा माणूस हिंदी गझल मध्ये संचार करत राहिलेला आहे. त्यांची हिंदी गझल ही तितकीच ताकदीची आहे.
आता नमनालाच घडाभर तेल जाळल्यामुळे मुळ उद्देश बाजूला पडतो की काय असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अधिकचा वेळ न दवडता मी कालिंदीच्या डोहातून या संग्रहाच्या डोहात उतरण्याचा प्रयत्न करतो.
सदर संग्रहातील आपल्या पहिल्याच कवितेत हा कवी म्हणतो,
आता एकच कर …
तू तुझ्यातील कृष्णाला कर तडीपार
मी सुद्धा लावतो बंदोबस्त
माझ्यातील राधेचा
अन होतो समाधीस्थ कालिंदीच्या डोहात ..
दुसऱ्याच कवितेत कवी एक मोठं विधान करताना म्हणतो,
ऊर्जा कधीच नष्ट होत नाही
ती फक्त होते रूपांतरित
अश्रूंची शब्दात
आणि शब्दांची कवितेत ….
कवी आपल्या चौथ्या कवितेत पुरुषी अधिकाराच्या अशा काही ठिकऱ्या उडवतो ते पहा. कवितेची सुरुवात आणि मध्य आपल्यासमोर ठेवत आहे.
काल रात्री
दिवा विझल्यानंतर .. आग लागली
आणि आग विझल्यानंतर
तो मला म्हणाला –
” मला आता तुझ्यात पहिल्यासारखी मजा येत नाही !”
विचार केला
हे जर मी बोलले असते त्याला तर ?
तर तो क्षणात झाला असता भस्मसात
अन् पसरली असती घरभर
त्याची चिमुटभर युजलेस राख ..
स्त्रीमनाच्या भावना उलगडणार्या अशा कितीतरी कविता या संग्रहात आपल्याला भेटत राहतात. आणि पुरुष म्हणून अंतर्मुखही करत राहतात, तर स्त्री वाचकांना त्या आपल्याशा वाटत राहतात.
सालं कठीणच दिसतंय ही देखील एक अफलातून कविता आहे. या कवितेची मांडणी मुक्तछंद रचनेचा आदर्श नमुना ठरू शकते इतक्या ताकदीनं कवीने या कवितेची निर्मिती केली आहे.
यातल्या काही ओळी आवर्जून ऐकवाव्याशा वाटतात.
स्वतःच्या सूर्याला स्वतःच जन्माला घालायचं
डोळ्यातील चंद्र सांगेल
त्या दिशेला चालत राहायचं
अजून एक …
कुणाच्याच डोळ्यातील
समुद्राची खोली मोजायची नाही
अन् आपल्याही लाटा
कुण्या काळीजदगडावर धडकतील
अशा योजना योजायच्या नाहीत
झाडांच्या आणि इतरही कविता कधी वाचकाला विचारप्रवृत्त करतात, तर कधी सजग करत राहतात मनाला. कधी दाखवून देतात शब्दांची ताकत, कधी दाखवून देतात कल्पनेची भरारी, कधी दाखवून देतात स्वतःतलं खुजेपण, तर कधी दाखवून देतात कवीच्या लेखणीतलं आभाळपण ..
या कवीच्या स्वतःवरच्या विश्वासाला देखील दाद द्यावीशी वाटते. हा कलंदर कवी एका ठिकाणी म्हणतोय,
मला प्राप्त झालीय दिव्य शक्ती
मी पाहू शकतो आता भरदिवसाही उघड्या डोळ्यांनी
रात्री हमखास पडणारे स्वप्न …
कवितेलाही जाब विचारणारा हा एकमेव कवी आहे असं वाटतं. कवितेला जाब विचारताना एके ठिकाणी कवी म्हणतो,
काय फक्त कविनेच प्रेम करावं कवितेवर ..
कवी कोणीच लागत नाही का कवितेचा ..
हल्ली फार त्रास देते कविता …
तर एका ठिकाणी हा कवी कवितेचीही माफी मागताना म्हणतो ,
कविते .. माफ कर
जरा जास्तच बोललो नाही …?
कवी काही ठिकाणी स्वतःच्याच आयुष्यात कवितेच्या माध्यमातून डोकावताना दिसतो आणि हे डोकावनेच त्याला कधीकधी कातर करून जाते. एका ठिकाणी कवी म्हणतो,
हा पचवून विषप्याला
जीव कितीदा गेला
खांद्यावर तरी मिरवतो
कवितेचा हिरवा शेला ..
मात्राबध्द कविता, ही या कवीची फार मोठी ताकत आहे. या वृत्तबंधात कवीने अनेक कविता लिहिलेल्या आढळतात. त्या साऱ्यांचाच मागोवा घेणे शक्य नसले, तरी त्यातील एक चरण वानगीदाखल दाखवता येईल. या चरणात कवी म्हणतो
जी येईल पायाखाली
ती चालत जाईन वाट
कधी हसतील माझे डोळे
कधी भिजतील पापणकाठ
अजून एका कवितेमध्ये कवी जीवनाचं अद्भुत दर्शन घडवतो. या चार ओळीत तो म्हणतो,
जगणाच्या बक्कळ इच्छा
मरणाचे एकच कारण
आत्म्याच्या चैनीसाठीच
देहाला केले धारण
यातल्या अनेक कवितांचे दाखले देत असताना, सगळं काही कळत असूनसुध्दा या काव्यमालेतील एका कवितेला ओलांडून मला पुढे जाता येत नाही. ती कविताच तशी आहे. पहा ..
ते आले .. त्यांनी मला आग्रह केला
म्हणाले,
‘ सर .. ह्यावेळेस
तुमच्याच हस्ते रावण दहन व्हायला पाहिजे
यंदा हा मान तुमचाच.’
“मी म्हटलं …
‘सॉरी मी आत्महत्या नाही करू शकत’
ते गोंधळले .. म्हणाले,
म्हणजे .. आम्ही नाही समजलो सर ..’
मी म्हणालो,
‘अरे ! मीच एक रावण आहे
तर मग मीच मला कसा जाळणार ?’
थोडा वेळ स्तब्धता नांदली मग
एक चिकित्सक बोलला .. खोचक
‘मग असं करूया सर ..
यंदा तुम्हीच रावण म्हणून उभे राहा
आम्ही तुमचंच दहन करू.’
मी म्हणालो ,
‘हरकत नाही; परंतु तुमच्यापैकी राम कोण आहे ?’
तर ते सगळेच उठून निघून गेले
सुपारी न खाताच
प्रामाणिक होते बिच्चारे !
खरे सांगायचं झालं तर वरील लेखमालेतील सगळ्याच कविता इथे देण्याचा मोह मी पराकोटीचा धीर करून टाळल्या आहेत. माझ्या या अवस्थेवरूनच तुम्हाला त्यातील कवितांची ताकद आणि जरब लक्षात येत असावी असं वाटतय.
आजकाल, उठसूठ मुक्तछंद लिहिणाऱ्यांना मी इतकाच सल्ला देईन , बाबांनो वाचा एकवेळ हा संग्रह , अन् मग धाडस होत असेल तरच लिहा कविता. नाहीतर लाईक कमेंटला कुठे लागते प्रतिभा. ते राहिलच की शस्त्र तुमच्याजवळ कायमचे. असो. ( हे ज्यांच्यासाठी आहे त्यांना कळेलच, बाकीच्यांनी लक्ष देण्याची गरज नाही )
काही चुका गुलाबी या सदरातील छंदोबध्द काव्यप्रकारही मनाला भुरळ पाडून जातो. यातील एका कवितेच्या ओळी तुमच्या पुढे ठेवतो…
कधी इतकेही साधे कुणी असू नये बाई !
कुणी घेऊन जाईल तुझ्या ओठांची गं शाई
तीळ पाठीचा चावून
कुणी भागवेल भूक
मग म्हणशील बाई
कशी झाली भूलचूक
अशी फुलायच्या आधी जाळू नये आमराई
कधी इतकेही साधे कुणी असू नये बाई !
आणि शेवटाला भेटतो , अपूर्व असा अभंगांचे रंग …
माझ्याही देहाला
फुटो एक फांदी
आणि व्हावी चांदी
पाखरांची ..
असं म्हणणारा चंद्रपूरच्या ऊर्जानगर मधील अवलिया कवी किशोर मुगल , हा खरोखरच आपल्या प्रत्येक कवितेतून वाचकाला एक अद्भूत ऊर्जा प्रदान करत जातो. या कवीचं जितकं अभिनंदन करावं तितकं थोडच आहे. कारण त्याने आपल्या कवितेला केवळ शब्द दिले नसून आपला प्राणच बहाल केला आहे. हे
मी म्हणत नसून कवीच आपल्या शब्दांतून व्यक्त होताना म्हणतोय –
अता होवो काही
नसे ह्याची तमा
श्वास केले जमा
तुझ्यासाठी …
असं श्वासांचं दान देणारे कवी फार थोडे असतात. त्यातितल एक नाव आहे ,
किशोर मंदाबाई दत्तात्रय मुगल
मित्रांनो , हा संग्रह वाचून कवीला नक्कीच कळवा. एवढीच विनंती. धन्यवाद.
मूल्य:१५०/-
संवेदना प्रकाशन,खापरखेडा

— वसंत शिंदे , सातारा.
९९२२७७६०२७
********
किशोर मुगल : परिचय
सध्या चंद्रपूर येथे कार्यरत.
एक्कावन्न कविता माझ्याही,दिवस निरुत्तर येतो आणि कालिंदीच्या डोहातून हे ३ कवितासंग्रह अनेक पुरस्कारांनी सन्मानित.
संपर्क : ८८०६५४४३३०
या लेखाची लिंक : https://sahityakshar.blogspot.com/2020/04/blog-post_6.html
******
