
समतेचे प्रवर्तक- महात्मा बसवेश्वर
आज आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सारे जग आपल्या हाताशीच नव्हे तर अगदी जणू मुठीतच आले आहे. प्रांत आणि देशांच्या सीमा धूसर होत आहेत. जागतिकीकरणाने जग एक खेडेच होत आहे. दळणवळण आणि संपर्क माध्यमांच्यामुळे अनेक गोष्टी सहज सुलभ होत आहेत. ज्ञान आणि उद्योग- व्यवसायाच्या संधी विविध पर्यायांनी आज आपल्यासमोर उपलब्ध आहेत. गुगल गुरूच्या मदतीने एका क्लिकवर ज्ञानाचा खजिनाच आपल्या डोळ्यांसमोर येतो आहे. भौतिक गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आमची अव्याहत धडपड सुरू आहे. यापलीकडेही स्वतःसाठी आणि इतरांसाठी म्हणून काही जगणं असतं, हेही सांप्रतकाळी समजून घेणे आवश्यक ठरणारे आहे.
एकविसाव्या शतकाबद्दलचे हे सांगणे याकरिता आहे की, आपण काळाच्या या तुलनेत आठ- नऊशे वर्षे मागे गेलो तर आपणास काय दिसेल ? अगदी पन्नास- शंभर वर्षांपूर्वी आपल्या भोवतीची सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थिती काय होती ? आपण ठामपणे सांगू शकतो, ती माणसाला ‘माणूसपण’ देण्यात हतबल ठरत होती. काही राजकीय आणि समाज क्रांतिकारकांनी आपल्या पूर्वसुरींच्या पावलावर पाऊल ठेवून माणसाला माणूसपण देता यावे म्हणून समतेच्या प्रस्थापनेसाठी अविरत कष्ट घेतले आहेत,आपले अवघे आयुष्य वेचले आहे. असे समाजधुरीण मात्र नेहमी अल्पमतात ठरले आहेत. प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध यांना सतत लढा द्यावा लागला आहे. अनेकांचे प्राण धोक्यात आले, तर अनेकांना आपला देह गमवावा लागला. सॉक्रेटीस- तुकाराम – गांधी -दाभोळकर -पानसरे -कलबुर्गी ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. महात्मा फुले, वि.रा.शिंदे, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. हमीद दलवाई अशा लोकांना टोकाचा संघर्ष करावा लागला आहे.
सन ११६७ (१९६७ नव्हे) म्हणजे नऊशे वर्षापूर्वीचा बाराव्या शतकातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग आपण इथे पाहू या.
अनुभव मंटपाच्या सभागृहात सर्व सदस्य मुक्तपणे चर्चेत सहभागी झाले आहेत. सर्व जाती-वर्णाचे लोक एकत्र आले आहेत. भिन्नभिन्न जातीच्या लोकांनी इष्टलिंग दीक्षा घेतली आहे. सगळेच आता लिंगायत झाले आहेत.वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या सर्वांसाठी एकत्र भोजन होत आहे. या समुहात एक आहे हरळय्या. जो जातीने चर्मकार अर्थात चांभार आहे. दुसरा आहे मधुवरस, जो ब्राह्मण आहे. दोघे लिंगायत होऊन अनुभव मंटपात नित्य सहभागी होत आहेत. हरळय्यासोबत त्याची पत्नी कल्याणी आणि मुलगा शीलवंत हेही नित्यनेमाने अनुभव मंटपात येताहेत. तसेच मधुवरसाचे कुटुंबही त्याच्यासोबत येत आहे. मधुवरसाची मुलगी कलावती हीसुद्धा अनुभव मंटपात नित्य येत आहे. एकदा हरळय्या आणि मधुवरस अनुभव मंटपात जवळजवळ बसलेले पाहून कुणीतरी सहजपणे म्हणून गेले, “मधुवय्या आणि हरळय्या,तुम्ही दोघे आता सोयरे व्हायला हरकत नाही. शीलवंत आणि कलावती यांचे लग्न झाले की पुरे.” खरंतर सहज म्हणून, बोलले गेलेले हे शब्द मधुवरसाने मनावर घेतले. त्याचा चेहरा खुलला. मन उल्हसीत झाले. त्याने हरळय्याकडे पाहिले. हरळय्या म्हणाला, “मधुवय्या, तुमची मुलगी सून म्हणून माझ्या चांभाराच्या घरी आल्यास ब्राह्मणजन काय करतील, तुम्हाला ठाऊक आहे का ? नको हा विचार.” अनुभव मंटपाच्या सहवासाने बदललेला मधुवरस म्हणाला, “हरळय्या, अरे, मी पुर्वीचा मधुवरस राहिलो नाही. माणसातली माणुसकी जाणणे मी शिकलो आहे. मी आता पूर्वीसारखा सनातनी आणि कर्मठ ब्राह्मण नाही. मी आता लिंगधारी लिंगायत आहे. तू तुझ्या कुटुंबाला विचारून घे. मी माझ्या मुलीला आणि पत्नीला विचारून घेतो. सर्वांची तयारी असेल तर मी या लग्नास तयार आहे.” दोन्ही कुटुंबांनी आपापल्या कुटुंबात चर्चा केली. सर्वांच्या सहमतीने विवाह निश्चित झाला. अनुभव मंटपात सर्वांच्या साक्षीने हा विवाह पार पडला. राजा बिज्जळाच्या कल्याण राजधानीत ब्राह्मण आणि चांभार या दोन जातीतील वधू-वरांचा विवाह झाला. खरंतर वधू आणि वर दोघेही आता ब्राह्मण वा चांभार नव्हतेच. तर ते लिंगायत झाले होते. त्यामुळे हा आंतरजातीय विवाह नव्हता. तरीही या धर्मविरोधी घटनेमुळे राजांने हरळय्या आणि मधुवरस यांचे डोळे काढण्याचा अघोरी हुकुम दिला. तसेच दोघांनाही हत्तीच्या पायी बांधून मृत्यू येईपर्यंत फरफटत ओढत नेण्याची शिक्षा जाहीर केली आणि ती प्रत्यक्षात अंमलात आणलीही !
हा प्रसंग बाराव्या शतकातील आहे, हे लक्षात घ्या. जातिव्यवस्था मोडून काढण्यासाठी या दोन बापांनी ठामपणे केलेले आत्मबलिदान महत्त्वाचे आहे. या दोघांनी ज्या प्रभावी विचाराखाली हा निर्णय घेतला, ते प्रभावी विचार महात्मा बसवेश्वर यांचे होते. एकूणच भारतवर्ष आणि अन्य देशांमध्ये प्रबोधनाचे पर्व सुरू होण्याआधीच असे क्रांतिकारी आणि विद्रोही विचार भारताच्या मंगळवेढा, कल्याण (कर्नाटक) या दक्षिण भागात रुजवले जात होते आणि ते प्रत्यक्षात आचरणातही आणले जात होते. ज्यांनी आपल्या अनुभव मंटपाच्या वचन सिद्धांतातून सर्व जगताला समतेचा आणि जगण्याचा मार्ग दाखवला ते आद्य समाजसुधारक महात्मा बसवेश्वर होते. सर्वसामान्यांसाठी ते बसवण्णा होते.तीच त्यांची प्रभावी ओळख आहे. हीच ओळख सर्व समाजात ठळक होणे आवश्यक आहे. पुरोगामी चळवळींसाठी गेली आठ-नऊशे वर्षे मार्गदर्शक आणि पथदर्शी ठरणारे त्यांचे जीवन आणि कार्य समजून घ्यायलाच हवे.
✍विश्वास सुतार,कोल्हापूर
शिक्षण विस्तार अधिकारी,पं.स.करवीर
९४२०३५३४५२
परिचय : 👉समाजभान उपक्रम संकल्पक
👉 आकाशवाणी मान्यताप्राप्त गायक
👉 संवादी विचार, खलिलवाणी या व्हीडीओ मालिकेद्वारी प्रेरणादायी विचार
👉 समतेचा विचार पेरणाऱ्या पुस्तकांचे लेखक : “भारतीय संविधान आणि लोक” , “तुकाराम नावाचा संत माणूस “
👉 दै.लोकमतमध्ये ‘खलिलवाणी’ आणि दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये ‘संवादी विचार’ साप्ताहिक मालिकांचे लेखन
👉 ‘शिक्षण विस्तार अधिकारी’ पदावर पं.स. करवीर येथे कार्यरत 👉शिक्षकांना प्रेरणा देणारा नवोपक्रमशील अधिकारी म्हणून ओळख
********

********
महाराष्ट्र शासनाचा श्री.नां.पेंडसे पुरस्कार विजेती कादंबरी
