सा हि त्या क्ष र

सुधीर देवरे यांना एक अनावृत्त पत्र -राकेश वानखेडे

मा. सुधीर देवरे सर,

             नमस्कार,

               आपली गोष्टीत मावत नाही ही कादंबरी नुकतीच वाचून संपवली .अत्यंत पारदर्शी असं निवेदन हे या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. कोणताही आडपडदा न ठेवता ती सहजपणे चित्ररूपी होते. खूप दिवसांपूर्वी मी  फ्योदर दस्तोवस्की यांची भूमिगत ( नोट्स फ्रॉम  अंडरग्राउंड )नावाची एक लघु कादंबरी वाचली होती. त्यातला वास्तवदर्शी आणि स्वयम् अंर्तचित्रणाचा अत्यंत विलक्षण असा तटस्थ प्रयोग एकोणिसाव्या शतकात रशियन साहित्यविश्वात केला गेला. खरं म्हणजे महाराष्ट्राने हा तटस्थतेचा नव्हे तर फक्त वास्तव चित्रणाचा दस्तवस्की याचा गुण घेतला .आणि स्वतःला मात्र लेखकाने चिकित्सेत पासून लांब ठेवले . परंतु आपण या कादंबरीत स्वतः ‘ स्व ‘ झोडपून काढताना दिसतात. आत्मटीकेचे हत्यार अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीने चाललेलं दिसतं.आपल्या आयुष्याचा कफल्लकपणा आणि आपण करत असलेल्या अनेक निरर्थक गोष्टींचा आपण धांडोळा घेत एक प्रकारे माणसाच्या जगण्यातले एक जे एकाकीपण असतं,ज्याला निरर्थकता किंवा ज्याला आपण जीवनाची नश्वरतासुद्धा म्हणू शकतो, ती अत्यंत ताकदीने या ठिकाणी मांडली आहे.

               आपल्या आसपास अनेक गोष्टी आपल्या मर्जीप्रमाणे चालत नाहीत, हे स्वीकारणारा नायक जरी साऱ्याच गोष्टींविषयी त्रागा करत असला, तरीसुद्धा तो आपल्या – आपल्या परीने मूल्य सांभाळून जगणारा आहे. तो कोणावरही ओरखडे उडत असला तरी, त्याची म्हणून एक मूल्यव्यवस्था आहे आणि ती खूपच गुणात्मक आहे. त्यामुळे व्यवस्थेचा प्रचार करणे हे त्याचे सेंद्रिय ब्रीद आहे असे दिसते. खरं म्हणजे हेच आपल्या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणता येईल.आजपर्यंत लिटिल मॅगझिनच्या चळवळीतून आलेल्या वास्तववादी लेखकांनी अत्यंत वास्तववादी लिहिण्याच्या नादात छंदीफंदी मनोरुग्ण असा नायक उभा केला. मला वाटत नाही की असा नायक समाजापुढे दिपस्तंभ म्हणून उभा राहील. आपण मात्र या कादंबरीच्या माध्यमातून उभ्या केलेल्या केलेल्या प्रयत्नात मूल्य पूर्णपणे यशस्वीपणे उभे राहतात, असे मला वाटते.

              साहित्य व्यवहारातले अनेक बारकावे, तसेच साहित्य व्यवहारातलं अंतर्गत घुसमट, राजकारण ,कंपूशाही, मोठमोठ्या लेखकांना आलेलं एखाद्या मठाधिपतीचं स्वरूप याविषयी आपण येथे निर्देश केलेला आहे. आणि मी मी कोणत्याही गटात नाही याचं इंगित, जाहीर,  घोषितसुद्धा केलेले आहे. आपला नायक स्वायत्ततेचा मार्ग अत्यंत जाणीवपूर्वक कृतिशीलपणे आणि निश्चित भूमिका घेऊन स्वीकारतो, हे फार महत्त्वाचे मला वाटते.

                       खरं म्हणजे कुठलेही लेखन हे लेखकाचं स्वतःचं अनुभव संचित असतं.तो आपलं चरित्रच दरवेळी नव्याने लिहून काढत असतो, आपल्या जगण्याची तो चिकित्सा करत असतो. जे- जे लिहायचं, जगायचं राहून गेलं ते तो लिखाणाच्या समांतर विश्वात भरून काढत असतो. तसेच आपल्या व्यक्तीगत, खाजगी जीवनाचे आणि जगण्याचे अनेक तपशील आम्हाला माहीत आहेत . ते या कादंबरीत  दिसतात देखील ,परंतु ते सारे तपशील अत्यंत कलात्मक गुंफनीचाद्वारे या कथात्म संहितेत मर्ज झालेले आहेत.

                     देव,धर्म, भय ,मैथुन, परंपरा, रिती यांच्यातला वांझपणा आणि माणूस म्हणून आपला त्यात गुंतलेला श्वास पकडण्याचं सूक्ष्म काम ही कादंबरी करते. आणि या साऱ्या तला फोलपणा देखील बारकाईने पकडते. खरं तर हे आपले आत्मचरित्रच असले पाहिजे असे मी म्हणेन .कारण आपल्या शब्दात सांगायचं तर येथे अनेक ‘ गाठी ‘ आणि ‘सरगाठी ‘ बांधून आपल्याच वेदनेला कलात्मक केलेले आहे, असे असले तरी आपला तटस्थ असा दृष्टीकोन सारखा प्रतिबिंबित होत राहतो. गीते मधल्या ‘साक्षीभाव ‘ आणि बौद्ध परंपरेतला ‘स्वयंप्रज्ञता ‘ जागोजागी दिसून येते. आपलं परंपरेतून मिळालेलं सर्वकाही चांगलं असतं असं गृहीतक स्वीकारून लिहिणारा लेखक करमणूकप्रधान फारतर लिहू शकतो ,परंतु तो भान देत नाही. आपल्या परंपरेत अनेक गोष्टी चिकित्सा कराव्यात अशा आहेत हेच तर आपली ही कादंबरी सांगते .खरंतर त्या इतक्या वाईट आणि व्यामिश्र अशा स्वरूपाच्या चालीरिती आहेत की, त्यांच्या गोष्टी सांगून सांगून देखील पूर्ण होणार नाहीत, इतक्या त्या अथकपणे आपल्या आसपास घडत असतात, हेच तर ही कादंबरी सांगते.

                  अत्यंत नाट्यमय असे प्रसंग वाचताना डोळ्यापुढे उभे ठाकतात. मला तर ग्रीक आणि रोमन नाटकं मधला जो स्टेजवर नेपथ्याद्वारे उभा केलेल्या ‘वन एक्ट प्ले’ असतो तसं चित्र डोळ्यासमोर दिसत होतं.  हा निवेदक अनेक गोष्टींचा डायलॉग आणि मोनोलोग आपल्याशी करतो आहे. तो समकालाची भानगड सांगता सांगता भूतकाळात घेऊन जातो, तेथून तो अलगदपणे बाहेर काढून, आपल्याला आजच्या आर्थिक कोंडीची,सामाजिक विषमतेची आणि राजकीय अपरिहार्यतेची गंमत(गोची ) सहज सहज सांगत राहतो. आणि आपण किती असहायपणे या साऱ्या गोष्टींकडे पाहतो याचं भान देखील तो देत राहतो.

              कादंबरीचे अभ्यासक असं म्हणतात की, ‘संस्कृतिक मॅच फिक्सिंग करण्याची वर्चस्ववादी दीर्घ परंपरा मराठीमध्ये असल्याने वांग्मयीन बाह्य राजकारणाला साहित्यकृतीने बहुजनांच्या अडाणीपणाचा फायदा घेत फसवत ठेवले आहे ‘. या म्हणण्याला आपली कादंबरी अपवाद आहे अशी माझी स्पष्ट धारणा आहे. दुसरी बाब म्हणजे मराठीत असंही म्हटलं जातं की, ‘साहित्य म्हणजेच आकांक्षा व सत्तेच्या स्पर्धेच्या राजकारणाचा खेळ असतो. ‘  परंतु आपण या कादंबरीतद्वारे आपल्या रोजच्या जगण्यातले साधे साधे प्रसंग अगदी -अगदी आसपास वावरणारे घराशेजारचे माजलेले  डुकरं ह्या प्रतिमांतून सुप्तपणे स्पर्धेच्या राजकारणाकडे इंगित केलेआहे.

              प्रत्येक ग्रंथ हे वाल्मिकी -व्यास- होमर- मिल्टन आणि कुंटे यांची सांस्कृतिक समरभूमी असते असं मर्ढेकरी आलोकिक सौंदर्यशास्त्र म्हणायचे .खरं म्हणजे या सगळ्या पारंपारिक अशा निकषांनी साहित्याला मोजण्याचे दिवस आता संपले आहेत. याचा सुतोवाच करणारी आपली कादंबरी आहे. पुढे  आत्मचरित्राच्या बाबतीतही लोक असे म्हणतात कि, ‘कुशलतेने खोटे पटवून देण्याची उत्तम कला म्हणजे आत्मचरित्र होय ‘. आपली कादंबरी वाचताना एकाच वेळेस ती कादंबरी म्हणून डिस्क्रिप्टिव्ह लिबर्टी घेताना दिसली त्याच वेळेस ती आत्मचरित्राचा बाज घेत परंतु प्रखर असं सत्य प्रतिपादनाची अत्यंत धाडशी भूमिका घेताना दिसते. एडवर्ड सईद याने ‘कल्चर अंड इम्पेरियलिस्म ‘ या ग्रंथात कादंबरी हीचे मूळ युरोपीय संस्कृती व साम्राज्यवादाची आधुनिक निर्मिती आहे,असे प्रतिपादन केले.परंतु हेही आता मागे पडले आहे. डेमोक्रसी इम्पेरीलिझम आणि या दोहोंच्या कचाट्यात सामान्य माणसाचे सापडलेले सांस्कृतिक जीवन अशी गोची आपल्या जगण्यात आलेली आहे. हे पटवताना आपली कादंबरी खात्रीशीरपणे उभी राहते.

        ‘कोसला ‘ सारखे सांस्कृतिक पिसे व राजकीय काड्या ती करत नाही किंवा ‘पानिपत ‘ मधील या देशातील गद्दारांच्या प्रतिमा उजळ करण्याचे पातक ती करत नाही. हे न करणे म्हणजे लोकप्रीय प्रघाताला नकार होय, हे मोठेच काम म्हटले पाहिजे. शिवाजी सावंतांच्या ‘मृत्युंजय ‘सारखे अंधश्रद्धेचे झुले पांघरण्यापेक्षा आपल्या रोजचे ताणेबाणे आणि मामुली प्रश्न यातून ती उभे ठाकलेले अंतर्यामी प्रश्नांचा शोध घेते. ‘मृत्युंजय’, ‘ स्वामी ‘किंवा ‘ययाती ‘ या कादंबऱ्यांनी मराठी लेखकांना ट्यूसर पॅराडाईम( ग्रीक प्रमाणक ) स्वीकारण्याची सक्तीच अनेक वर्ष चालत आलेली आहे. त्यांच्या या सांस्कृतिक दुराग्रहला छेद देण्याचे काम दलित साहित्याने प्रथम केले आणि प्रभाव मुक्त लेखन काय असू शकते हे दाखवून दिले. आपल्या कादंबरीवर कोणाच्याही प्रभावाची छटा दिसत नाही, प्रभाव मुक्त कादंबरी असच मी या कादंबरीला म्हणेन.

              आपल्या भाषेचा पोत आणि सौष्ठव हा स्वतंत्र विषय आहे, तो पुणेरी किंवा प्रभावातून आलेला सदाशिवपेठी नाही ही जमेची बाजू होय.  आपला पोत अस्सल अहिराणी आणि कान्हेरी नदीच्या मंथनने संतृप्त आहे असे मला वाटते. कादंबरीचे अभ्यासक आणि समीक्षक जी. के .ऐनापुरे असं एकेठिकाणी म्हणतात  की , ‘ब्राह्मणीसाहित्य आणि त्यातून निर्माण झालेले सांस्कृतिक वर्चस्व रोखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आणली ‘ .खरं म्हणजे बहुजन वर्गातून आलेल्या किती लिहित्या लेखकांना ह्या नॅरेशनचं सांस्कृतिक भान आहे? हा खरा कळीचा मुद्दा आहे .परंतु आपण एका वाक्यात आपली भूमिका मांडली, ‘ते म्हणजे देवाची गाणी सिनेमाच्या चालीवर म्हणावी लागतात यातच देवांचा पराभव आहे ‘ यातून आपण एका व्यवस्थेला नकार देत दुसरी स्वीकारली आहे.आपल्या या कादंबरीत संशोधनं येतात, वन्यजीव येतात अशा अनेक भौतिक, लौकिक आणि पारलौकिक माणसांना स्पर्श  ती करते.  येथे कादंबरीत मांजराला आडवी जाणारी माणसं सापडतात, तशीच ओठांच्या पुरस्कारांची रस्सीखेच करणारी माणसेही दिसतात, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आक्रस्ताळा प्रपोगंडा स  बळी पडलेली माणसे ही दिसतात .सेलफोनच्या धुंदीत हरवलेलं आजचं तारुण्य दिसते, तसेच ‘महामुषकांची निर्मिती ‘ असे वक्र शब्दयोजना करून त्यामागे आपल्या व्यवस्थेची खिल्ली उडवत, निषेध मांडणारी शैली या कादंबरीत अधोरेखित होत जाते.

             सुधर्म देव किरण याचं भटकणं, आजच्या व्यापक जगण्याचा एक भाग आहे. तसेच त्याचे भरकटणे हेदेखील आजच्याच जगण्याची निकड आहे. व्यक्तिगतते कडून त्याचं समष्टीकडे होणारे संक्रमण मूल्ययुक्त आणि ‘स्व’ आयुष्याचे विविध अँगलमधून एक्स-रे काढणारे आहे. तुमचा जो तुमच्या पुरता  आशय होता  तो समष्टीसमग्र होतो. कोणता आशय? हाच की, खरोखर माणसाचं जगणं हे गोष्टीत मावणारे नसतं !

– राकेश वानखेडे ( 94 23 54O 366)


******

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top