
मतकरींची‘लोककथा’
आमच्या परिसरातली..
मराठीतील एक प्रयोगशील नाटककार रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी ऐकली आणि मन सुन्न झाले.
आम्ही एकदम भूतकाळात गेलो.
मतकरींचं ‘लोककथा ७८’ हे नाटक गाजत होतं,तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो.
अभ्यासक्रमाला नुकतंच हे नाटक लागलं होतं.आम्हाला ‘मराठी वाड़मयाचा इतिहास’हा विषय शिकवणारे नरहर कुरुंदकर गुरुजी यांनी रंगभूमीच्या संदर्भातील विवेचक प्रास्ताविक केलं आणि ‘लोककथा ७८’या नाटकाच्या अध्यापनाची जबाबदारी दत्ता भगत सरांकडे सोपवली.
भगत सरांनी या नाटकाच्या संहितेतील प्रयोगशीलता,पारंपरिक रंगभूमीपासून हे नाटक कसे वेगळे आहे वगैरे वेगवेगळी उदाहरणे देऊन सांगितले.
याच दरम्यान या नाटकाचे कथाबीज नांदेड परिसरातील आहे आणि मतकरींनी त्या परिसराला प्रत्यक्ष भेट दिलेली आहे,असे कळले.
त्यामुळे ‘लोककथा ७८’ या नाटकाच्या लेखन निर्मिती प्रक्रियेविषयी आमची उत्सुकता कमालीची ताणली गेली.
विद्यार्थी दशेपासूनच आमच्यात लेखनाचा किडा होता.तो स्वस्थ बसू देत नसे.या ऊर्मीतून लेखन घडे.त्याकाळी ‘माणूस’ नावाचं साप्ताहिक विशेष चर्चेत होतं.श्री.ग.माजगावकर हे व्यासंगी आणि तटस्थवृत्तीचे संपादक.वस्तुनिष्ठ आणि ताज्या घटनांवरील मजकूराला आवर्जून प्रसिध्दी देण्याचं त्यांचं धोरण.नव्या लिहिल्या हातांचा शोध घेण्याची निकोप दृष्टी.
नाईक हे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच भागात म्हणजे विदर्भ-मराठवाडयाच्या सीमा प्रदेशात दरोडेखोरांनी हैदोस घातलेला होता.आमच्या गावात दुकानात झोपलेल्या देवराव कदम यांना चोरट्यांनी बेदम मारहाण केली.या मारहाणीत त्यांचा पाय मोडला.या घटनेचा वृत्तांत आम्ही माणूस कडे पाठविला.दुस-याच आठवड्यात मुखपृष्ठ कथा म्हणून ‘माणूस’ मध्ये तो छापून आला.माणूस हे साप्ताहिक कुठल्याही बसस्थानकावर अथवा पुस्तकाच्या दुकानात सहज मिळत असे.या साप्ताहिकाचा वाचकवर्ग मोठा होता आणि तो सर्व स्तरातला होता.आम्ही या साप्ताहिकाचे नियमित वाचक होतो.या मागची प्रेरणाही तशीच होती.
काही दिवसांपूर्वी नायगाव जवळील बेटक बिलोली येथे एक भयंकर घटना घडली होती.कोळी समाजातील एका कुटुंबावर गावगुंडांनी हल्ला चढविला होता.मिलिंद आठवले नावाच्या आमच्या मित्राने कोळी कुटुंबावर झालेल्या या अत्याचाराचा वृत्तांत ‘माणूस’कडे पाठवला आणि तो लगोलग प्रसिध्दही झाला.एका मिलिटरी मध्ये असलेल्या माणसाला हातपाय बांधून जिवंत जाळण्याचा प्रयत्न गावगुंडांनी कसा केला,याची अंगावर शहारे आणणारी ही जिवंत स्टोरी होती.
ही स्टोरी रत्नाकर मतकरींनी वाचली
आणि त्यावर त्यांनी ‘लोककथा ७८’ हे नाटक लिहिलं,असं सांगितलं जातं.ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत यांच्या ‘मराठी रंगभूमीचा १९९० पर्यंत चा इतिहास’ या ग्रंथात तशी ओझरती नोंद आलेली आहे.आठवले हे आमचे मित्र असल्यामुळे आम्ही खूप वर्षांपूर्वी या बाबींची खातरजमा करून घेतली आहे.’लोककथा७८’ या नाटकाचं कथाबीज नांदेड जवळील नायगाव परिसरातील बेटक बिलोलीचं.या नाटकाचा एक प्रयोग सुध्दा या गावात झाला.रत्नाकर मतकरी यांनी या गावाला भेट दिल्याचंही कळलं.
तिस-या रंगभूमीवरचं हे एक अत्यंत महत्त्वाचं नाटक.रंगभूमीचे पारंपरिक संकेत झुगारून देणारं.प्रेक्षकांमधून पात्रांचा प्रवेश ही जशी या नाटकाची खाशियत तशीच ताज्या विषयाची उत्तम मांडणी हे या नाटकाचं अंगभूत वैशिष्ट्य.सेवादलाच्या माध्यमातून या नाटकाचे अनेक प्रयोग झाले.काही भारतीय भाषांमधून हे नाटक आलं.अर्थात हे नाटक म्हणजे रिपोर्ताज वगैरे असल्याचा शेरा मारायला तत्कालीन पठडीतले समीक्षक कमी नव्हते,हे वेगळं सांगायची गरज नाही.
‘लोककथा ७८’ ची कथा ही नांदेड परिसरातील आहे,याची वाच्यता नाटककाराने फारशी कुठं केल्याचे ऐकिवात नाही.परंतु ‘लोककथे’तील भळभळतं वास्तव हे आमच्या गावपरिसरातील आहे,यांची जितीजागती जाणीव आमच्या स्मृतिकोशात अद्याप जपून ठेवलेली आहे.
या दृष्टीने रत्नाकर मतकरी यांचा नांदेडशी वेगळा अनुबंध होता.
त्यामुळे मतकरींच्या जाण्याचे दु:ख आम्हा नांदेडकरांसाठी अत्यंत वेदनादायी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
– डॉ.जगदीश कदम, नांदेड
