सा हि त्या क्ष र

पळसदेव येथील मंदिराचे पुरातत्वीय महत्त्व

प्रास्तविक :  हे पुणे जिल्ह्यात, इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावाजवळील उजनी धरणाच्या पाण्यात बुडालेले एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर किमान १००० वर्षांपेक्षा जास्त जुने असून, ४६ वर्षांपूर्वी उजनी धरणाच्या निर्मितीमुळे जलसमाधी घेतलेले होते.उजनी धरण हे भीमा नदीवर बांधलेले असून त्याचे बॅक वॉटर जवळपास भिगवण या दौंड, जि. पुणे तालुक्यातील गावापर्यंत येते.  कर्नाटकच्या आलमट्टी धरणामुळे दर वर्षी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात प्रचंड पूर येत असल्याने तेथून कृष्णेच्या पात्रातून थेट उजणी धारनापर्यंत मोठा कालवा खोदल्यामुळे आता हे मंदिर पुन्हा कधीच दिसणार नाही.

या मंदिराच्या अवतीभवती असणारे विष्णू मंदिर, बळी मंदिर आणि सोमेश्वर मंदिर तसेच लागटचे सरडेश्वर मंदिरही  परत कधीच दिसणार नाही. गावापासून पूर्वी या मंदिरापर्यंत उन्हाळ्यात होडीने जाता येत होते.

इतिहास :  हे मंदिर नेहमी पुणे सोलापूर हायवेवरून दिसायचे. धरण भरले की यांचा फक्त कळसाचा भाग दिसायचा. हे मंदिर चालुक्यकालीन असल्याचा अंदाज आहे. साधारणतः अकराव्या शतकात या मंदिराची निर्मिती झाली असावी. प्राचीन काळी पळसदेव हे गाव नहुष राजाच्या राजधानीचे ठिकाण होते. या मंदिरातच राजाने ९९ यज्ञ केल्याचे उल्लेख आहेत. एका ऋषीच्या शापामुळे या राजाला सुस्त अजगर किंवा सरडा होऊन स्वर्गातून खाली येथे पडावे लागल्याची आख्यायिका पुराणांत आढळते.म्हणून पळसनाथा शेजारच्या मंदिराला सरडेश्वर मंदिर म्हटले जाते.   फलटणचे राजे निंबाळकर यांनी या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंदही आढळते.

या मंदिराचे महत्त्व : मंदिराजवळ असलेल्या सरडेश्वराच्या मंदिरात देवनागरी लिपीतील एक शिलालेख आहे, ‘चंगदेव दंडनाके विष्णुगृह केले’ असे शब्द त्यामध्ये कोरलेले दिसतात. ११व्या-१२व्या शतकात हजार सुवर्णनाणी त्यासाठी देण्यात आल्याचा उल्लेखही त्यात असल्याचे अभ्यासक सांगतात.मराठी चे जे आद्य  ५ शिलालेख आहेत त्यातील एक शिलालेख म्हणून येथील शिलालेखाला एकमुखी मान्यता आहे. हा शिलालेख पुढीलपरामाणे वाचता येतो-

श्री चांगदेव दंडनाकें विष्णुगृह केलें । ईश्वर संवछरी नीफजले । प्रासादी बसवण ऊवजा तेहाचे पुत्र भाइया । बंभी निष्पत्ती सोनेया साहस्त्रू एकु  १००० प्रासादिअ अकरवातोत्तरे भूमी १०० दाउपसाउ वाहिला । सकु १०७९ मंगल महश्री ।  अक्षी शिलालेख रायगड जिल्ह्यातील अक्षी गावात असलेला, मराठी भाषेतील सर्वात जुना लिखित पुरावा मानला जातो, जो १०१२ (शके ९३४) मध्ये शिलाहार राजा केशिदेवरायच्या काळात कोरला गेला होता. हा एका गधेगळीवर देवनागरी लिपीत कोरलेला असून संस्कृत-मराठीत आहे आणि यामध्ये देवीसाठी धान्य दान दिल्याचे नमूद केले आहे. त्यानंतरचा मराठी भाषेचा पुरावा दाखवणारा हा दूसरा शिलालेख असल्याने पळसनाथ मंदिराच्या शिलालेखाचे पुरातत्वीय महत्त्व वादातीत आहे.     

अक्षी येथील शिलालेख

ज्ञानेश्वरीच्या आधी इ. स. १२८९ मधील उनकेश्वरचा  शिलालेख प्रसिद्ध आहे. यात संस्कृत मिश्रीत मराठी रुपांचा वापर केलेला आढळतो. इ. स. १२७३ मधील पंढरपूरचा प्रसिद्ध असा ८४ चा शिलालेख येतो. त्यात ‘ तेयाची’, ‘विठ्ठलाची’ असे मराठी शब्द आहेत. त्यानंतर १२२८ चा अंबाजोगाई येथील खोलेश्वराच्या मंदिरात असलेल्या शिलालेखाला मान मिळतो. या ४७ ओळीतील ५ ते ७ ओळी चक्क मराठीत आहेत. सर्वात जुना शिलालेख कर्नाटकातील श्रवणबेळगोळचा मानला जातो. पण त्याही आधी  अक्षी येथील शिलाहार राजाचा शिलालेख प्राचीन असल्याचे दिसून येते. इ. स.१०६० च्या दिवेआगर येथील ताम्रपटावरचा लेखही महत्त्वाचा मानला जातो. मात्र मराठीतील दूसरा शिलालेख म्हणून पळसदेवचा वरील शिलालेख मानला जातो.भीमा व सीना नदी यांचा जिथे संगम होतो त्या कुडाळ सगम या ठिकानचा शिलालेख इ. स. १००० च्या आसपासचा मानला जातो. मात्र तो वादग्रस्त असून त्याबाबत अनेक मत मतांतरे आहेत.

  
समारोप :    मंदिरे पुस्तकांसारखी वाचता येतात. मात्र त्यासाठी आपली दृष्टी तीक्ष्ण पाहिजे; वृत्ती शोधक पाहिजे. बऱ्याचदा हे शिलालेख आपल्या समोर असतात पान त्यांचे अस्तित्व आपल्या लक्षात येत नाही. उदय. बार्शी टाकळी येथील शिलालेख बारीक असून तो मंदिराच्या भिंतीवर अगदी वरच्या बाजूला साधारण १ चौ. फुट पेक्षा कमी जागेत कोरलेला आढळतो.     

*****

डॉ. संजय बोरुडे /अहिल्यानगर, ९४०५०००२८०  

***************************************************************************************************************

Just Published:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top